नाशिक : बेकायदा दुकान थाटून कीटकनाशक औषधांची राजरोसपणे विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या तपासणीत हा प्रकार समोर आला असून याप्रकरणी दुकानमालकावर पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धीरज किरण मगर (रा.जय कॉम्प्लेक्स,रविवार पेठ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीत दुकानमालकाचे नाव आहे. मगर याने पंचवटीतील विजय नगर भागात असलेल रविकिरण सोसायटीतील ताजने बंगल्यात हा व्यवसाय सुरू केला होता. याबाबत जिल्हापरिषदेच्या कृषी विभागाकडे तक्रार प्राप्त झाली होती. कृषी पथकाने धाड टाकून पाहणी केली असता हा बेकायदा व्यवसाय समोर आला आहे. संशयीताने कीटकनाशक औषधांची विक्री व साठवणुक परवानगी न घेता हा व्यवसाय सुरू केला होता. चौकशीत संशयीताने कीटकनाशक विक्री वगळता साठवणुकीचे सबळ कारण न दिल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला असून शेतक-यांची दिशाभूल करून शासनाचा महसूल बुडविल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी कृषी विकास अधिकारी अभिजीत जमधडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक केदार करीत आहेत.