नाशिक : विदेशी शिक्षण घेतल्याचा बनाव करून विवाहास भाग पाडलेल्या अकोले जि.अहमदनगर येथील डॉक्टर पतीसह सासरच्या मंडळीकडून नोकरदार महिलेस मानसिक व शारिरीक छळ करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. स्त्रीधन काढून घेत माहेरून आर्थिक मदत व गृहकर्जासाठी तगादा लावल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ.प्रतिक भांगरे,डॉ.विद्या भांगरे व डॉ.अशोक भांगरे (रा.सर्व अकोले जि.अ.नगर) अशी विवाहीतेचा छळ करणा-या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी ३४ वर्षीय विवाहीतेने तक्रार दाखल केली आहे. संशयीतांचे अकोले येथे भागरे नावाचे प्रसिध्द रूग्णालय आहे. डिसेंबर २०१४ मध्ये हा विवाह पार पडला. महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,विवाहापूर्वी पती डॉ.प्रतिक भांगरे याने लंडन येथून एमआरसीपी या वैद्यकीय पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतल्याचे सांगण्यात आले होते. तसा फलकही संबधीतांना आपल्या रूग्णालयावर लावलेला आहे. आई वडिलांची दिशाभूल करून संशयीतांनी विवाहास भाग पाडले. विवाहानंतर एक कोटीचा फ्लॅट घेण्यासाठी माहेरून पैसे आणावेत तसेच गृहकर्जासाठी तगादा लावून विवाहीतेचा मानसिक व शारिरीक छळ करण्यात आला. तसेच महिलेच्या पगारातून सासू सास-याच्या कारचा हप्ता भरावयास लावून उर्वरीत रक्कम पतीच्या खात्यात वर्ग करण्यास भाग पाडले. पगारातील रकमा घेवून आर्थिक पिळवणुक केली. तसेच ५० तोळे वजनाचे स्त्रीधन बळजबरीने काढून घेतल्याचा आरोप महिलेने केला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक काकवीपुरे करीत आहेत.