लष्कराच्या आर्टिलरी सेंटर भागातील चंदनाचे झाड तस्करांनी कापून नेले
नाशिक : लष्कराच्या आर्टिलरी सेंटर भागातील चंदनाचे झाड तस्करांनी कापून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, कडेकोट बंदोबस्त असलेल्या आर्मिच्या आर्टीलरी सेंटर भागाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रवी बाबुराम कुमार (रा.आर्टीलरी सेंटर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. आर्मी आर्टिलरी सेंटर मधील वालदेवी फार्म मधून मंगळवारी (दि.९) अज्ञात चोरट्यांनी सुमारे पाच हजार रूपये किमतीचे चंदनाच्या झाडाचे खोड कापून नेले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक चौधरी करीत आहेत.
हातातील मोबाईल हिसकावून नेला
नाशिक : रस्त्याने मोबाईलवर बोलत जाणा-या तरूणाच्या हातातील भ्रमणध्वनी दुचाकीस्वार भामट्यांनी हिसकावून नेल्याची घटना सिडकोतील त्रिमुर्तीचौक भागात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामप्रताप राधेशाम राजभर (२२ रा.भगतसिंग चौक,जगतापवाडी सातपूर) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. राजभर मंगळवारी (दि.९) मोबाईल खरेदीसाठी त्रिमुर्तीचौक भागात गेले होते. दिव्या अॅड लॅब सिनेमा थेअटर भागातील शोरूममधील कागदपत्राची पुर्तता करून ते शिवा बार जवळून पायी जात असतांना ही घटना घडली. रस्त्याने फोनवर बोलत जात असतांना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तीघांपैकी एकाने त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.