कुटुंबिय कामात व्यस्त; चोरट्यांनी लंपास केला सोन्याचांदीच्या दागिण्यासह ५८ हजाराचा ऐवज
नाशिक : कुटूंबिय कामात व्यस्त असल्याची संधी साधत चोरट्यांनी उघड्या घरात घुसून सोफ्यावर पडलेले पाकिट चोरून नेले. या पाकिटात रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ५८ हजाराचा ऐवज होता. याप्रकरणी अंबड पोलीस ठाम्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुवर्णा रविंद्र काजळे (रा.राधा मौर्य अपा.सदाशिवनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. काजळे या गेल्या गुरूवारी (दि.४) सकाळच्या सुमारास घरात साफसफाई करीत असतांना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी उघड्या घरात प्रवेश करून सोफ्यावर ठेवलेले पाकिट चोरून नेले. या पाकिटात ८०० रूपयांची रोकड, मोबाईल आणि सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ५८ हजार रूपयांचा ऐवज होता. अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.
८० हजाराचे मंगळसूत्र केले लंपास
नाशिक : दुचाकीवर प्रवास करणा-या महिलेच्या गळयातील मंगळसूत्र भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना मोतीवाला कॉलेज भागात घडली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनाली ज्ञानेश्वर पाटील (रा.शिवशक्तीचौक,शिवाजीनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पाटील बुधवारी (दि.१०) कामानिमित्त शालिमार भागात आल्या होत्या. रात्री त्या बारदान फाट्याकडून शिवाजीनगरच्या दिशेने आपल्या अॅक्टीव्हा दुचाकीवर प्रवास करीत असतांना ही घटना घडली. मोतीवाला कॉलेज भागात पाठीमागून दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी महिलेच्या गळ्यातील सुमारे ८० हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सुर्यवंशी करीत आहेत.