नाशिक : अपहरण आणि दमदाटी करीत सदनिका दुस-याच्या नावावर खरेदी करून घेणा-या दोघांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयीत तब्बल पंधरा वर्षापासून पोलीसांना गुंगारा देत होते. ही घटना औद्योगीक वसाहतीतील श्रमिकनगर भागात घडली होती. दोघांना सातपूर पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले असून ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने केली.
करमजितसिंग कपुरसिंग रिपीयाल (५६ रा.अष्टविनायक रो हाऊस,लवटेनगर जयभवानीरोड) व अनिल बाबुराव शिंदे उर्फ मामा (५४ रा.चाडेगाव राजवाडा,एकलहरा) अशी अटक केलेल्या संशयीतांची नावे आहेत. सन.२००६ मध्ये ही घटना घडली होती. योगेश रामभाऊ भवर (रा.श्रमिकनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. संशयीतांसह त्यांच्या साथीदारांनी भवर यांचे घर गाठून तुझ्या वडिलांनी आमच्या कडून सहा लाख रूपये घेतले होते. त्याचे २४ लाख रूपये झाले आहेत. तू पैसे दे नाही तर तुझी प्रॉपर्टी आमच्या नावावर करून दे असे बोलून संशयीतांनी भवर यांचे चारचाकी वाहनातून अपहरण केले होते. भवर यांना एका फ्लॅटमध्ये घेवून जात दमदाटी केली त्यानंतर त्यांना थेट दुय्यम निबंधक कार्यालयात घेवून जात बळजबरीने भवर यांच्या नावावरील रो हाऊस परविन इराणी यांच्या नावे खरेदी करून घेतला होता. संशयीतांच्या ताब्यातून सुटका करून घेत भवर यांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या गुह्यात अन्य संशयीतांना अटक करण्यात आली होती. मात्र दोघे संशयीत फरार होते. गेल्या पंधरा वर्षापासून ते पोलीसांना गुंगारा देत होते. पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी फरार संशयीतांवर लक्ष केंद्रीत केल्याने दोघे पोलीसांच्या हाती लागले आहेत. युनिट २ चे कर्मचारी राजेंद्र घुमरे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून,पोलीसांनी सापळा लावून चाढेगाव व लवटेनगर येथे दोघांच्या मुसक्या आवळल्या.