नाशिक – घरभरणीसाठी आलेला पाहुणा लिफ्टमध्ये अडकल्यामुळे वॅाचमनला बेदम मारहाण; उपचार सुरू असतांना मृत्यु
नाशिक : घरभरणीसाठी आलेला पाहुणा लिफ्टमध्ये अडकल्याने वॅाचमनला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना विहीतगाव येथे घडली. या मारहाणीत वॅाचमनचा मृत्यु झाला असून याप्रकरणी घरभरणीचा कार्यक्रम आयोजीत करणा-या सदनिकाधारकासह त्याच्या नातेवाईकांविरूध्द उपनगर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लक्ष्मण याकल यादव (५३ रा.गायकवाड मळा,गोरेवाडी) असे मृत वॅाचमनचे नाव आहे. यादव शनिवारी (दि.६) रात्री विहीतगाव येथील म्हसोबा मंदिर भागात जखमी अवस्थेत मिळून आले होते. अज्ञात टोळक्याने बेदम मारहाण केल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आला होता. उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यु झाला. यादव ईश्वर संकल्प या सोसायटीत वॅाचमन म्हणून काम पाहत होता. शनिवारी याच इमारतीत राहणा-या फ्लॅट नं. ६०४ बी या सदनिकाधारकाने घरभरणीचा कार्यक्रम आयोजीत केला होता. कार्यक्रमासाठी आलेले पाहूणे लिफ्ट मध्ये अडकल्याने टोळक्याने वॅाचमन असलेल्या यादव यांना बेदम मारहाण केल्याचे पोलीस तपासात समोर आले असून सहाय्यक उपनिरीक्षक सदाशिव कोकाटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक चौधरी करीत आहेत.
पार्क केलेल्या दुचाकी पळवून नेली
नाशिक : शहरात मोटारसायकल चोरट्यांनी हौदोस घातला असून पार्क केलेल्या दुचाकी पळवून नेल्या जात आहेत. सारडा सर्कल भागात पार्क केलेली नवी कोरी बुलेट चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युनूस अयुब पठाण (रा.किशोर सोसा.मनोहर मार्केट सारडा सर्कल) यांनी तक्रार दाखल केली आहे. पठाण यांची सुमारे दोन लाख रूपये किमतीची एमएच ०४ केटी ७८६२ ही बुलेट मंगळवारी (दि.९) मनोहर मार्केट परिसरातील रिक्षा स्टॅण्ड येथे लावलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. अधिक तपास जमादार शेख करीत आहेत.