नाशिक – घर खाली करण्यास सांगितल्याने संतप्त चौघांनी महिला आणि तिच्या मुलींवर केली दगडफेक
नाशिक : घर खाली करण्यास सांगितल्याने संतप्त चौघांनी महिला आणि तिच्या मुलींवर दगडफेक केल्याची घटना फुलेनगर येथील गौंडवाडीत घडली. या घटनेत दगड लागल्याने महिला जखमी झाली असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अर्जुन बागुल,जया बागुल (रा.दोघे गौडवाडी), नितीन चव्हाण व स्विटी चव्हाण (रा.दोघे कोटमगाव ता.निफाड) अशी महिलेवर दगडफेक करून जखमी करणा-या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी सुनिता अर्जुन बागुल (रा.डायमंडनगर,रोकडोबावाडी) यांनी तक्रार दाखल केली आहे. सुनिता बागुल या सोमवारी (दि.८) आपल्या मुलींना सोबत घेवून गौडवाडीत गेल्या असता ही घटना घडली. आर्थिक देवाण घेवाणीतून महिलेच्या नावावर असलेले घर संशयीतांना खाली करण्यास सांगितल्याने हा वाद झाला. घरखाली करण्यास महिलेने सांगितल्याने संतप्त संशयीतांनी तिला शिवीगाळ करीत दगड व विटा फेकून मारले. या घटनेत महिलेस दगड लागल्याने ती जखमी झाली असून अधिक तपास हवालदार पठाण करीत आहेत.
महिलेच्या गळयातील मंगळसूत्र ओरबडले
नाशिक : दुचाकीस्वार महिलेच्या गळयातील मंगळसूत्र भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना पारिजातनगर भागात घडली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निकीता प्रसाद गायधनी (रा.पांडवनगरी,इंदिरानगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गायधनी सोमवारी (दि.८) पारिजातनगर भागात गेल्या होत्या. सायंकाळच्या सुमारास त्या वनविहार कॉलनी रस्त्याने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना ही घटना घडली. गणपती मंदिर परिसरातून त्या जात असतांना पाठीमागून भरधाव आलेल्या मोटारसायकलस्वाराने त्यांच्या गळयातील सुमारे १५ हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बैसाणे करीत आहेत.