नाशिक : सणासुदीचा काळ संपताच घरफोडीच्या घटना उघड होवू लागल्या असून, बाहेरगावाहून घरी परतलेल्या व वेगवेगळया भागात राहणा-या दोन कुटूंबियांचे घरे चोरट्यांनी फोडल्याचे समोर आले आहे. दोन्ही घरफोडीत चोरट्यांनी सुमारे एक लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला असून याप्रकरणी अंबड आणि उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सिडकोतील अश्विननगर भागात राहणारे जयेश गोविंद महाले (रा.महेंद्रा गेस्ट हाऊस समोर,अश्विननगर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, महाले कुटूंबिय ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या खिडकीचे गज तोडून ही चोरी केली. घरात शिरलेल्या चोरट्यांनी बेडरूममधील लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्याचांदीचे दागिणे चोरून नेले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक कैलास सोनवणे करीत आहेत. दुसरी घटना रामदास स्वामी नगर भागात घडली. मंगल सुरेश बर्वे (रा.प्रकाश रो हाऊस,ओम शांती लॉन्स समोर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. बर्वे यांचे बंधू गांधीनगर मागील रामदास स्वामी नगर भागात राहतात. रविवारी (दि.७) भावाचे कुटूंबिय बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या नवरंग सोसायटीतील पगारे भवन या बंगल्याच्या बेडरूमची स्लाईडींग खिडकीतून प्रवेश करीत पलंगावर ठेवलेली पर्स चोरून नेली. या पर्स मध्ये ५ हजाराची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिणे व महत्वाचे कागदपत्र असा सुमारे ५० हजाराचा ऐवज होता. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार माळोदे करीत आहेत.