सातपूर औद्योगीक वसाहतीत चक्कर येवून पडल्याने कामगाराचा मृत्यु
नाशिक : कारखान्यात काम करीत असतांना चक्कर येवून पडल्याने ५० वर्षीय कामगाराचा मृत्यु झाला. ही घटना सातपूर औद्योगीक वसाहतीत घडली. याप्रकरणी पोलीस दप्तरी मृत्युची नोंद करण्यात आली आहे. श्यामसुंदर रामभरोसे वैष्णव (रा.सातपूर कॉलनी) असे मृत कामगाराचे नाव आहे. वैष्णव औद्योगीक वसाहतीतील आयडीएस कंपनीतील कामगार आहेत. रविवारी (दि.७) दुपारच्या सुमारास ते कारखान्यात नियमीत काम करीत असतांना अचानक चक्कर येवून जमिनीवर कोसळले होेते. सहकारी कामगारांनी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार सय्यद करीत आहेत.
…….
वेगवेगळय़ा भागात पार्क केलेल्या तीन दुचाकी चोरीला
नाशिक : शहरात मोटारसायकल चोरीची मालिका सुरूच असून वेगवेगळय़ा भागात पार्क केलेल्या तीन दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी म्हसरूळ,भद्रकाली आणि नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पेठरोड भागातील कांतीलाल अमृता खोठरे (रा.ओंकारनगर) हे ३१ऑक्टोबर रोजी किशोर सुर्यवंशी मार्गावरील जुई नगर भागात गेले होते. सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली त्यांची वेगो मोपेड (एमएच १९ बीसी ६५८१) चोरट्यांनी चोरून नेली. दुचाकीच्या डिक्कीत सुमारे सात हजार रूपये किमतीचा मोबाईल होता. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक फुगे करीत आहेत. दुसरी घटना द्वारका भागात घडली. श्रीधर गोविंद वाडेकर (रा.काठेगल्ली) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. वाडेकर यांची एमएच १५ बीझेड ५९८५ दुचाकी गुरूवारी (दि.४) रात्री द्वारका परिसरातील राधिका हॉटेलच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक सोनवणे करीत आहेत. तर देवळाली गाव येथील किशोर विजय शिसोदे (रा.गांधी पुतळ््या जवळ) यांची एमएच १५ डीए ०४६० दुचाकी शनिवारी (दि.६) रात्री नाशिकरोड परिसरातील हॉटेल दर्शनच्या आवारात पार्क केलेली असतांना चोरट्यांनी ती पळवून नेली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार शिंदे करीत आहेत.