नाशिक : गुन्हेगारी कारवायांमुळे हद्दपारीची कारवाई केलेली असतांना शहरात वावरणा-या एका गुडास पोलीसांनी जेरबंद केले. ही कारवाई औद्योगीक वसाहतीतील अशोकनगर भागात करण्यात आली. संशयीताच्या अंगझडतीत धारदार कोयता मिळून आला असून याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय युवराज पाटील (रा.आनंद सागर रो हाऊस,महादेव मंदिरामागे श्रमिकनगर) असे अटक करण्यात आलेल्या तडिपार गुंडाचे नाव आहे. अक्षय पाटील याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्यास शहर पोलीसांनी एक वर्षासाठी शहर आणि जिह्यातून तडिपार केलेले आहे. मात्र त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. पोलीस त्याच्या मागावर असतांनाच तो रविवारी (दि.७) अशोकनगर येथील रिक्षा स्टॅण्ड भागात आला असल्याची माहिती मिळाली. पोलीसांनी सापळा लावून त्यास जेरबंद केले त्याच्या अंगझडतीत धारदार कोयता मिळून आला असून याप्रकरणी अंमलदार श्रीकांत साळवे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार सुर्यवंशी करीत आहेत.