नाशिक : अॅटोरिक्षाने प्रवास करीत असतांना सहप्रवासी असलेल्या भामट्या महिलेने पर्स मधील पाकिट हातोहात लांबविल्याची घटना सिडको ते बिडीकामगारनगर दरम्यान घडली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेवती जगदिश नागपुरे (रा.रायगड चौक,सिडको) यांनी तक्रार दाखल केली आहे. नागपुरे या शनिवारी (दि.६) भाऊबिज निमित्त बिडी कामगार नगर येथे जात असतांना ही घटना घडली. सिडकोतून त्या बिडी कामगार नगर येथे जाण्यासाठी अॅटोरिक्षाने प्रवास करीत असतांना सहप्रवासी असलेल्या भामट्या महिलेने नागपुरे यांचे लक्ष नसल्याची संधी साधत पर्स मधील पाकिट चोरून नेले. या पाकिटात सुमारे ८० हजार रूपये किमतीचे मंगळसुत्र होते. अधिक तपास हवालदार लोहकरे करीत आहेत.