नाशिक : शहरात विनयभंगाचे प्रकार वाढले असून एकट्या दुकट्या महिलेस गाठून शरिरसुखासाठी अंगलट करण्याचा प्रयत्न केला जात आहेत. वेगवेगळया ठिकाणी विनयभंगाच्या नुकत्याच दोन घटना घडल्या असून, त्यातील एकीचा घरात घुसून तर दुस-या घटनेत परिचीतानेच विवाहीतेचा विनयभंग केला आहे. याप्रकरणी मुंबईनाका व इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी एका संशयीतास बेड्या ठोकल्या आहेत. ठक्कर बाजार परिसरातील राजदूत हॉटेल पाठीमागे राहणा-या पीडित विवाहीतेने दिलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी (दि.१) सायंकाळच्या सुमारास ती आपल्या घरात झोपलेली असतांना संतोष तुकाराम सोनवणे (४८) या शेजा-याने घरात कुणी नसल्याची संधी साधत उघड्या घरात प्रवेश करून माझे तुझ्यावर प्रेम आहे, तुला आता सोडणार नाही असे म्हणत महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी संशयीतास अटक केली आहे. अधिक तपास हवालदार गाढवे करीत आहेत. दुसरी घटना ज्ञानेश्वरनगर भागात घडली. पिडीतेने दिलेल्या तक्रारीनुसार संशयीत क्रिष्णा बुलेट उर्फ किशोर हा तिचा परिचीत असून त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून इच्छा नसतांना वेळोवेळी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तसेच तिच्या बद्दल अश्लिल व अपशब्द वापरून नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांमध्ये बदनामी केली. महिलेचे फोटो आणि मोबाईल नंबर फेसबुकवर टाकल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक उघडे करीत आहेत.