नाशिक : शहरात सणासुदीच्या काळात घरफोडीची मालिका सुरू असून वेगवेगळया ठिकाणी झालेल्या तीन घरफोडींमध्ये चोरट्यांनी सुमारे पावणे दोन लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला.त्यात एका भरदिवसा झालेल्या घरफोडीचा समावेश असून चोरट्यांनी लॅपटॉप आाणि सोन्याचांदीचे दागिणे असा ऐवज चोरून नेले. याप्रकरणी आडगाव आाणि सरकारवाडा पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमृतधाम परिसरातील संदिप नामदेव चौरे (रा.गंगोत्री कॉलनी,बिडी कामगारनगर) हे दि.१८ ऑगष्ट रोजी घराबाहेर पडले असता अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून हॉलमधून सुमारे २० हजार रूपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार लोहकरे करीत आहेत. दुसरी घटना शरणपूररोड भागात घडली. या ठिकाणी एकास सोसायटीतील दोन फ्लॅट चोरट्यांनी फोडले पी अॅण्ड टी कॉलनीत राहणा-या स्नेहा गजेंद्र चौधरी (रा.विशाखा सोसायटी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. चौधरी कुटुंबिय आणि शेजारी नयनसिंग क्षत्रिय यांचे कुटूंबिय सोमवारी (दि.१) बाहेरगावी गेले असता चोरट्यांनी दोघांच्या फ्लॅटचे लॅचलॉक तोडून एकाच्या घरातील बेडरूममधील कपाटातून तर दुस-याच्या वोडरोबच्या ड्राव्हर मधून सोन्याचांदीचे दागिणे,मोबाईल आणि मनगटी घड्याळ असा सुमारे १ लाख ६२ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक काकवीपुरे करीत आहेत.