नाशिक : शहरात मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच असून वेगवेगळया ठिकाणी पार्क केलेल्या तीन दुचाकी चोरट्यांनी नुकत्याच पळवून नेल्या. याप्रकरणी पंचवटी,सरकारवाडा आणि भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान दुचाकी चोरट्यांचा पोलीसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. हिरावाडीतील मनोहर सदाशिव आहिरे (रा.कमलव्हिला अपा.सप्तशृंगी दवाखान्याजवळ) यांची अॅक्टीव्हा एमएच १५एफएच ५६३८ सोमवारी (दि.१)दुपारच्या सुमारास त्यांच्या सोसायटीच्या भिंतीलगत पार्क केलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार वनवे करीत आहेत.दुसरी घटना जिल्हारूग्णालय आवारात घडली. या घटनेत जखमी शालकाची मोटारसायकल मेव्हण्याने पळवून नेली.याप्रकरणी गोकुळ लक्ष्मण दिवे (रा.ओझरखेड,गिरणारे) यांनी तक्रार दाखल केली आहे. दिवे जखमी अवस्थेत गेल्या ७ मे रोजी जिल्हारूग्णालयात दाखल झाले होते. बेशुध्द अवस्थेत त्यांच्यावर उपचार सुरू असतांना मेव्हणे रमेश बाबुराव चौघुले यांनी जखमी शालकाच्या खिशातील मोटारसायकलची चावी काढून घेत रूग्णालय आवारात पार्क केलेली एमएच १५ एचजे २०७३ ही युनिकॉर्न दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक साबळे करीत आहेत. तर मयुरेश विजय भालेराव (रा.तिरूपतीनगर,दसक शिवार) हे मंगळवारी (दि.२) तपोवनरोड भागात कामानिमित्त गेले होते. मारूती वेफर्स नजीकच्या हुंडाई शो रूम भागात त्यांनी आपली पॅशन एमएच १५ एफएल ४०७१ दुचाकी पार्क केली असता चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक पाटील करीत आहेत.