नाशिक : गॅरेज मालक असलेल्या दोघा भावांवर टोळक्याने हल्ला करीत एकावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना औद्योगीक वसाहतीतील कार्बन नाका भागात घडली. या घटनेत गॅरेज मालक बंधू जखमी झाले असून, याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चार जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीतापैकी एकास पोलीसांनी अटक केली आहे. प्रदिप सतिष पाटील (३३ रा.स्वप्नपुर्ती अपा.नागरे चौक,अशोकनगर) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव असून, त्याचे सोनू मनियार आणि अन्य दोन साथीदार अद्याप फरार आहेत. याप्रकरणी सचिन रमेश घटी (रा.श्रमिकनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. घटी यांचे कार्बननाका भागात भारत स्पेअर पार्ट व वाहन दुरूस्तीचे दुकान आहे. गेल्या रविवारी (दि.३१) रात्री ते आपल्या घरी असतांना कामगारांना कोणी तरी मारत असल्याचा त्यांना फोन आला. त्यामुळे घटी यांनी दुकानात धाव घेतली असता संशयीतांनी त्यांच्यावर हल्ला करीत धारदार शस्त्राने सपासप वार केले. यावेळी घटी यांचे भाऊ त्यांच्या मदतीला धावून आले असता संशयीतांनी त्यांनाही लाथाबुक्यांनी मारहाण करीत जखमी केले. अधिक तपास उपनिरीक्षक शेंडकर करीत आहेत.