पेन्शनची रोकड काढून बँक बाहेर पडलेल्या वृध्दाची रोकडसह बँग केली लंपास
नाशिक : पेन्शनची रोकड काढून बँक बाहेर पडलेल्या वृध्दाची रोकड असलेली शबनम बॅग भामट्यांनी हातोहात लांबविल्याची घटना परशुराम सायखेडकर नाट्यगृह परिसरात घडली. बॅगेत ३५ हजाराची रोकड आणि महत्वाची कागदपत्र होती. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वासूदेव शंकर जोशी (८२ रा.डीजीपीनगर,आंबेडकरनगर समोर) यांनी तक्रार दाखल केली आहे. जोशी सोमवारी (दि.१) सकाळी प.सा.समोरील बँक आॅफ महाराष्ट्र मध्ये पेन्शनची रोकड काढण्यासाठी आले होते. ३५ हजाराची रोकड काढून ते बँक बाहेर पडले असता आवारातच त्यांच्या अंगास अचानक खाज सुटली. त्यामुळे त्यांनी बॅग बाजूला ठेवली असता अज्ञात भामट्यांनी ती हातोहात लांबविली. अधिक तपास हवालदार चौधरी करीत आहेत.
बसमध्ये चढतांना महागडा मोबाईल केला लंपास
नाशिक : बसमध्ये चढत असतांना प्रवाशी डॉक्टरचा महागडा मोबाईल भामट्यांनी हातोहात लांबविल्याची घटना नाशिकरोड बसस्थानकात घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ.हार्दिंक पदमाकर कोंडार (रा.पुणे) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. डॉ.कोंडार सोमवारी (दि.१) कामानिमित्त शहरात आले होते. सायंकाळच्या सुमारास ते नाशिकरोड बस स्टॅण्ड येथे नाशिक – पुणे बस मध्ये चढत असतांना ही घटना घडली. गर्दीची संधी साधत अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातील अॅपल कंपनीचा सुमारे ३५ हजार रूपये किमतीचा मोबाईल हातोहात लांबविला. अधिक तपास हवालदार दराडे करीत आहेत.