नाशिक – चेन स्नॅचिंग करणा-या अभियंतासह चार जणांना पोलिसांनी गजाआड केले आहे. दंगल उर्फ उमेश पाटील असे या सोनसाखळी चोरणा-या अभियंत्याचे नाव आहे. संशयित पाटीलकडे तुटलेले २७ सोन्याचे मंगळसूत्र व अडीच लाखाची रोकड आढळली आहे. पोलिसांनी या अभियंताकडून चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या सोनारांकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल ५६ गुन्ह्यांची उकल झाली आहे. ज्यांची सोनसाखळी चोरीला गेली अशा २७ महिलांना बोलावून ओळखपरेड घेतली असता त्यांनी आपले दागिने ओळखले.
या कारवाईची माहिती पोलीस आयुक्त दीपक पाण्ड्ये यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपायुक्त (गुन्हे) संजय बारकुंड, पोलीस अमोल तांबे, विजय खरात उपस्थितीत होते. सहाय्यक आयुक्त दिपाली खन्ना, गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन वर्षातील चोरीच्या घटनांचा अभ्यास केल्यानंतर हे गुन्हे उघड झाले. चोर आसाराम बाजू आश्रमालगतचा पूल, कटारिया पूल व कृषीनगर जॉगिंग ट्रॅक रस्त्याचा वापर करत असल्याचे पोलिसांना आढळले. त्यानंतर या तिन्ही ठिकाणी पोलिसांनी साध्या वेशात दुचाकीवरून गस्त सुरू केल्यानंतर मोटारसायकलवर भ्रमंती करणाऱ्या दंगल उर्फ उमेश पाटीलला ताब्यात घेतले. पाटील याच्या जॅकेटमधील पिशवीत मोटारसायकलच्या क्रमांकाची पट्टी व स्क्रू आढळले. त्यानंतर त्याची चौकशी केल्यानंतर तो सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. संशयित पाटीलकडे तुटलेले २७ सोन्याचे मंगळसूत्र व अडीच लाखाची रोकड आढळले.
असा हस्तगत केला मुद्देमाल
अभियंता उमेश पाटील हा तुषार ढिकले या साथीदाराच्या मदतीने २०१८ पासून ते नोव्हेंबर २०२० पर्यंत स्पोर्ट्स बाईकवरून सोनसाखळ्या लंपास करत होता. पण, या दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर उमेश हा एकटाच सोनसाखळी चोरी करत होता. तो चोरलेल्या सोनसाखळ्या आपला मित्र विरेंद्र उर्फ सॅम निकम याच्या मदतीने गोपाळ गुंजाळ या सोनाराला विकत होता. त्यानंतर गुंजाळ हा मुद्देमाल सराफ बाजारातील पंढरीनाथ वाघ यांच्या अंबिका ज्वेलर्समध्ये विकत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांना हे रॅकेट उघड केले. त्यानंतर सोने वितळवून तयार केलेल्या २५० ग्रॅम वजनाच्या २० लगडी हस्तगत केल्या. तसेच उमेशने स्वत चोरलेल्या सोनसाखळी मुकुंद दयानकर या सोनाराला विकल्याचे समोर आले. त्याच्याकडून ९० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या लगडी हस्तगत करण्यात आल्या आहेत.