नाशिक : खुर्ची दिली नाही या कारणातून दोघांनी जीवे मारण्याची धमकी देत तरूणास बेदम मारहाण केल्याची घटना जेलरोड भागात घडली. या घटनेत हातातील वजनी कड्याने मारहाण केल्याने तरूण जखमी झाला असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडू चंद्रमोरे आणि सचिन कागडा (रा.दोन्ही जेलरोड) अशी मारहाण करणा-या संशयीतांची नावे आहेत. गणेश अंबादास कांगूने (२१ रा.आम्रपाली झोपडपट्टी,कॅनोल रोड) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. कांगुने रविवारी (दि.३१) सायंकाळच्या सुमारास शेजारी राहणा-या कांताबाई पाल यांच्या ओट्यावर खुर्ची टाकून बसलेला असतांना ही घटना घडली. दोघा संशयीतांनी त्यास गाठून खुर्चीची मागणी केली. मात्र कांगूने याने खुर्ची देण्यास नकार दिल्याने संतप्त दोघांनी त्यास शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत एकाच्या हातातील लोखंडी कडे लागल्याने कांगुने जखमी झाला असून अधिक तपास जमादार गोसावी करीत आहेत.