नाशिक – चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून भामट्यांनी तब्बल साडे सोळा लाख रूपयांना एकास गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. ऑनलाईन पैसे भरण्यास भाग पाडून हा गंडा घालण्यात आला असून याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणूक आणि आयटीअॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनंतकुमार शामसुंदर मराळकर (रा.काठेगल्ली,द्वारका) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मराळकर हे सोशल मीडियावर नोकरीचा शोध घेत होते. प्लेसमेंटच्या माध्यमातून ते नोकरी शोधत असतांना याच काळात त्यांना वेगवेगळय़ा मोबाईल आणि लॅण्डलाईन नंबर वरून संपर्क साधण्यात आला होता. तसेच मेल आयडीवरही नोकरीचे आमिष दाखविण्यात आले होते. त्यामुळे मराळकर यांचा विश्वास बसला. दि.२ ते १६ सप्टेंबर दरम्यान चांगल्या पगाराची नोकरीचे आमिष दाखवत भामट्यांनी मराळकर यांना इंडियन आणि बरोडा बँक खात्यात वेगवेगळी कारणे सांगून तब्बल १६ लाख ५९ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. महिना उलटूनही नोकरी अथवा पैसे परत न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने मराळकर यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास निरीक्षक सुरज बिजली करीत आहेत.