नाशिक : शहरात विनयभंगाचे प्रकार वाढले असून, वेगवेगळया भागात राहणा-या महिलेसह अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी म्हसरूळ आणि अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यातील एकास अटक करण्यात आली आहे. मातोरीरोड भागात राहणा-या पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार मंगेश माधव हेगडे (२२ रा.हेगडे मळा, मातोरीरोड मखमलाबाद शिवार) या युवकाने तिचा विनयभंग केला. गेल्या मार्च महिन्यापासून संशयीत सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलेवर पाळत ठेवून होता. तसेच महिलेस एकटी गाठून शरिरसुखाची मागणी करीत होता. महिलेने त्यास नकार दिल्याने त्याने विनयभंग करीत आपले प्रेमसंबध असल्याची पतीकडे सांगण्याची धमकी दिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीतास पोलीसांनी अटक केली असून अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत. दुसरी घटना सिडकोतील उत्तमनगर भागात घडली. आई वडिल कामावर गेल्याची संधी साधत रविंद्र जगताप (रा.एकता चौक,उत्तमनगर) या संशयीताने बुधवारी (दि.२७) शेजारी राहणा-या अल्पवयीन मुलीस आपल्या घरात बोलावून घेत तिचा विनयभंग केला. ही बाब मुलीने आपल्या कुटूंबियांकडे कथन केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून तिच्या आईच्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम (पोस्को) कायद्यान्वये अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पावरा करीत आहेत.