नाशिक : मदतीचा बहाणा करीत भामट्याने एटीएमकार्डची आदला बदल करून बँक खात्यातील ८५ हजाराची रोकड परस्पर काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडू हनुमंता शिंदे (रा.भाऊसाहेबनगर,शिंदे वस्ती वंजारवाडी पो.शेणीत ता.जि नाशिक) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. शिंदे बुधवारी (दि.२७) भगूर येथे गेले होते. सायंकाळच्या सुमारास ते गायकवाड गल्लीतील एचडीएफसी बँकेच्या एटीएम बुथमध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता ही घटना घडली. एटीएममधून पैसे काढत असतांना अज्ञात भामट्याने त्यांना मदतीचा बहाणा केला. मशिन खराब असल्याने पैसे कट होत असल्याची बतावणी करीत भामट्याने एटीएम कार्डची आदला बदल केली. यावेळी कार्ड टाकून पावती काढण्याचा सल्ला दिल्याने शिंदे यांच्या कार्डचा पिन चरून पाहून नंतर बदल केलेल्या कार्डच्या माध्यमातून शिंदे यांच्या बॅक खात्यातील ८५ हजाराची रोकड परस्पर काढण्यात आली. अधिक तपास जमादार पाचोरे करीत आहेत.