कार शोरूमच्या आवारातून चंदनाची तस्करी
नाशिक : कार शोरूमच्या आवारातील चंदनाच्या झाडाचा बुंधा भामट्यांनी कापून नेल्याचा प्रकार औद्योगीक वसाहतीत समोर आला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिता नंदू नेरकर (रा.सोमेश्वर कॉलनी,सातपूर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. नेरकर यांचे सातपूर औद्योगीक वसाहतीत कारचे शोरूम आहे. गुरूवारी (दि.२८) अज्ञात चोरट्यांनी शोरूमच्या भिंतीवरून उडी मारून सुरक्षा रक्षकांच्या कॅबीन पाठीमागील सुमारे ५००० रुपये किमतीचा चंदनाचा लाकडी बुंधा कापून नेला. अधिक तपास पोलीस नाईक गायकवाड करीत आहेत.
उघड्या घरातून लॅपटॉपसह मोबाईल चोरी
नाशिक : कुटूंबिय आपआपल्या कामात व्यस्त असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी उघड्या घरात शिरून लॅपटॉप व मोबाईल चोरून नेल्याची घटना डॉ.बाबासाहेब आंबेडकरोड भागात घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उन्मेश रामचंद्र गायधनी (रा.उन्मेष बिल्डींग,डॉ.आंबेडकर रोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गुरूवारी (दि.२८) सकाळच्या सुमारास ही घटना घडली. गायधनी कुटूंबिय आपआपल्या कामात व्यस्त असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी उघड्या घरात प्रवेश करून हॉलमधील सोप्यावर ठेवलेला लॅपटॉप आणि मोबाईल असा सुमारे २० हजार रुपए किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार दराडे करीत आहेत.