नाशिक : साक्षीदार म्हणून जबाब दिल्याने एकाने वकिलाची वाट अडवित गावठी कट्टा लावून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना जिल्हा न्यायालयाच्या आवारात घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात एका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्दूल लतीफ यासीन कोकणी (४२ रा.कोकणीपुरा,भद्रकाली) असे संशयीताचे नाव आहे. अॅड.युवराज देवरे (रा.औरंगाबादरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. वाहन पार्क करण्याच्या वादातून काही दिवसांपूर्वी बंदोबस्तावरील पोलिसासह वकीलांना शिवीगाळ आणि दमदाटी केल्याप्रकरणी कोकणी याच्याविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुह्यात अॅड. देवरे यांनी साक्षीदार म्हणून जबाब नोंदविल्याने जामिनावर सुटलेल्या संतप्त कोकणी याने मंगळवारी (दि.२६) कोर्ट आवारात हे कृत्य केले. अॅड.देवरे हे आवारातील वडाच्या झाडाजवळून जात असतांना संशयीताने त्यांना अडविले. यावेळी संतप्त संशयीताने शिवीगाळ करीत तसेच गावठी कट्टा अॅड.देवरे यांच्या कमरेस लावून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खैरणार तपास करीत आहेत. दरम्यान कोकणी कोकणीविरोधात किंवा त्याचे अनेक खटले जिल्हा कोर्टात सुरू असून, त्याचा नेहमीच वावर असतो. मात्र, वकीलांना शिवीगाळ, पोलिसांना दमदाटी तसेच न्यायाधिशांनाही उद्धट उत्तरे असे प्रकार त्याच्याकडून नेहमीच होतात. या पार्श्वभूमीवर नाशिक वकील संघाची बैठक होवून त्याच्या बंदोबस्तासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश आणि पोलीस आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले आहे.