नाशिक : इनोव्हा कारमधील चौघांनी एका डॉक्टरला मारहाण केल्याची घटना गडकरी चौकात घडली. अपघातग्रस्त वाहनाची नुकसान भरपाई न दिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ.किशोर नांद्रे पाटील (रा.उंटवाडी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. डॉ. नांद्रे पाटील गेल्या बुधवारी (दि.२०) सायंकाळच्या सुमारास एमएच १८ बीसी ७६५७ या कारमधून कालीका मंदिराकडून गडकरी चौकाच्या दिशेने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. गडकरी चौक परिसरात पाठीमागून भरधाव आलेल्या एमएच ०२ जेएन २३३७ या इनोव्हा कारने डॉक्टरच्या वाहनास धडक दिली. या घटनेत डॉ. नांद्रे पाटील यांच्या वाहनाचे मोठे नुकसान झालेले असतांना इनोव्हाकारमधील चौघांनी त्यांना शिवीगाळ व दादागिरी करीत मारहाण केली. नांद्रे पाटील पोलीसांकडे तक्रार देण्यासाठी निघाले असता संशयीतांनी तक्रार न करण्याची विनंती करीत नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले. मात्र अनेक दिवस उलटूनही संशयीतांनी नुकसान भरपाई न दिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून अधिक तपास हवालदार आडके करीत आहेत.