नाशिक : चाकूचा धाक दाखवत टोळक्याने दोघा मित्रांना लुटल्याची घटना विनयनगर भागात घडली. या घटनेत रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे हिसकावून घेत पोबारा केला असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात जबरीलुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासिन अली अन्वर अली शेख (रा.सराफ बाजार) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. शेख गुरूवारी (दि.२८) रात्री विनयनगर भागात गेले होते. प्रभुदेवा अपार्टमेंटच्या पाठीमागील मैदानात ते सुशांत दुलाई नामक मित्रांशी गप्पा मारत असतांना ही घटना घडली. चार जणांच्या टोळक्याने दोघा मित्रांना गाठून चाकूचा धाक दाखवत व जीवे मारण्याची धमकी देवून दोघांच्या खिशातील रोकड,मोबाईल व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ४० हजार रूपयांचा ऐवज बळजबरीने हिसकावून घेत पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक श्रीवंत करीत आहेत.