नाशिक : कार अडवून हल्ला करीत चालकाची सोनसाखळी हिसकावून पोबारा करणा-या तीघांना जेरबंद करण्यात भद्रकाली पोलीसांना यश आले आहे. संशयीतांना न्यायालयाने शनिवार (दि.३०) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अरबाज अहमद शेख,मुजमिल मोहिदीन शेख व इम्तियाज अली शेख अशी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. प्रतिक मदन (रा.सावरकरनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मदन अन्य दोघांसह सोमवारी (दि.२५) रात्री द्वारका भागात गेले होते. सेलटॉक्स कारने तिघे टॅक्टर हाऊस कडे जाणा-या सर्व्हीस रोडने प्रवास करीत असतांना ही घटना घडली होती. अज्ञात टोळक्याने कार अडवित पुढील काच फोडून ही लुटमार केली होती. या घटनेत टोळक्याने कारमधील तिघांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करीत एकावर धारदार शस्त्राने हल्ला केला होता. तसेच एकाच्या गळयातील सुमारे ८० हजार रूपये किमतीची सोनसाखळी हिसकावून घेत पोबारा केला होता. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस लुटारूंच्या मागावर असतांना हवालदार युवराज पाटील यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. तिघा संशयीतांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. संशयीताना न्यायालयाने शनिवार (दि.३०) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.