नाशिक : शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीवर मोठा फायदा करून देण्याचा बहाणा करून भामट्यांनी एकास साडे चार लाख रूपयांना गंडविल्याचा प्रकार पुढे आला आहे. वेगवेगळया बँक खात्यात पैसे भरण्यास भाग पाडून हा गंडा घालण्यात आला असून याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुक आणि आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेमंत खंडेराव सोनवणे (रा.गोकुळधाम,हिरावाडी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. १८ मे ते १३ ऑगष्ट दरम्यान भामट्यांनी सोनवणे यांच्या मोबाईलवर वेगवेगळया क्रमांकावरून संपर्क साधत हा गंडा घातला आहे. ट्रेड २४ रिसर्च या कंपनी मधून बोलत असल्याचे सांगून भामट्यांनी शेअर मार्केटमध्ये ट्रेंडिग करून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. त्यानुसार ट्रेडिंग करण्यासाठी जेना स्मॉल फायनान्स व इंडसइंड बँकेचे खात्यात ४ लाख ६२ हजार २०७ रूपये भरण्यास भाग पाडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास निरीक्षक सुरज बिजली करीत आहेत.