नाशिक – दुकान फोडून चोरट्यांनी सुमारे ८३ हजार रूपये किमतीचे रेडिमेड कपडे चोरले
नाशिक : दुकान फोडून चोरट्यांनी सुमारे ८३ हजार रूपये किमतीचे रेडिमेड कपडे चोरून नेल्याची घटना सामनगाव रोड भागात घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास अंबादास शिंदे (रा.अश्विनी कॉलनी,सामनगावरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. शिंदे यांचे सामनगाव रोड भागात अॅडिक्शन फॅशन हब नावाचे रेडिमेड कपड्यांचे दुकान आहे. मंगळवारी (दि.२५) रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून ही चोरी केली. दुकानात शिरलेल्या चोरट्यांनी काचेच्या काऊंटरमध्ये ठेवलेले सुमारे ८२ हजार ८५० रूपये किमतीचे रेडिमेड कपडे चोरून नेले. त्यात जिन्स,शर्ट पॅण्ट चा समावेश आहे. अधिक तपास हवालदार शिंदे करीत आहेत.
…..
मोटवानी रोडला तरूणाची आत्महत्या
नाशिक : मोटवाणी रोड भागात राहणा-या २९ वर्षीय तरूणाने आपल्या राहत्या इमारतीच्या पार्किंग मध्ये गळफास लावून आत्महत्या केली. सदर तरूणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. प्रविण संजय गाभने (रा.उमीया निवास,लोकमान्यनगर) असे आत्महत्या करणा-या तरूणाचे नाव आहे. गाभने याने बुधवारी (दि.२६) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घराचे पार्किंगमधील छताच्या लोखंडी हुकाला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यु झाला. याबाबत नरेश पटेल यांनी खबर दिल्याने मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार गोसावी करीत आहेत.