तृतीय पंथीसह महिलेवर प्राणघातक हल्ला
नाशिक : घरी येवून वाद घालतो याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तृतीय पंथीयासह एका महिलेवर तरूणाने कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना फुलेनगर येथे घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी संशयीतास ताब्यात घेतले आहे. हेमंत बाबुराव गांगुर्डे (२६ रा.वैशालीनगर,फुलेनगर) असे पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी २२ वर्षीय जखमी महिलेने तक्रार दाखल केली आहे. तृतीयपंथी असलेल्या मैत्रीणीच्या घरी जावून संशयीताने सोमवारी (दि.१०) वाद घातला होता. त्यामुळे दोघी मैत्रीणी मंगळवारी (दि.११) दुपारच्या सुमारास संशयीताच्या घरी वैशालीनगर येथे जाब विचारण्यासाठी गेल्या असता ही घटना घडली. यावेळी तृतीय पंथी असलेल्या व्यक्तीने संशयीताने माझ्या घरी येवून तमाशा का करतो असा जाब विचारला असता संतप्त झालेल्या संशयीताने शिवीगाळ करीत तुमची कटकटच मिटवतो असे म्हणून कमरेच्या मागे लपविलेला कोयता काढून महिलेच्या, तृतीयपंथी मैत्रीणीवर हल्ला केला. या घटनेत तृतीयपंथी मैत्रीणीच्या डोक्यावर आणि हातावर वार करण्यात आला असून तिचा डावा हात मनगटपासून तुटला आहे. यावेळी तक्रारदार महिला आपल्या मैत्रीणीच्या मदतीस धावून गेली असता तिच्याही दोन्ही हातांवर वार करण्यात आले असून दोघी महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक डंबाळे करीत आहेत.
…..