नाशिक : हायड्रोलीक सिलेंडर टेस्टींग करतांना हलगर्जी पणा केल्याने कारखान्यात स्फोट झाल्याप्रकरणी कारखाना मालकासह व्यवस्थापक आणि एका मृत कामगारावर सातपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत चार जणांचा मृत्यु तर तीन जण भाजले होते. कुणाल ललित शिकारे (रा.सावरकरनगर)ललित कंपनीचे मालक),कृष्णा प्रसाद (रा.अहमदाबाद,गुजरात) व सुरज विष्णू पेखळे (रा.माडसांगवी,ताजि नाशिक) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीतांची नावे असून शिकारे हे स्फोट झालेल्या ललित कंपनीचे मालक आहेत. तर प्रसाद अहमदाबाद येथील सोपान कारखान्याचे व्यवस्थापक आहेत. संशयीतांमधील ललित कंपनीचे कामगार पेखळे यांचा या घटनेत मृत्यु झाला आहे. सातपूर औद्योगीक वसाहतीतील ललित हायड्रोलिक सिस्टीम या कारखान्यात गेल्या १८ सप्टेंबर रोजी ही घटना घडली होती. यात चंद्रकांत निमसे,रोशन दास,लखन पडणारिया आणि सुरज पेखळे यांचा मृत्यु झाला होता. तर देविदास पवार,विजय प्रसाद आणि कृष्णा प्रसाद हे जखमी झाले होते. पोलीसांच्या तपासी अहवालावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी राजू पठाण यांनी तक्रार दाखल केली आहे. संशयीत शिकारे हे कंपनी मालक असतांना कारखान्यात हायड्रोलीक सिलेंडरची जोडणी व टेस्टींग होत असतांना कामगारांच्या सुरक्षीततेच्या दृष्टीने कुठल्याही सुविधा पुरविल्या नाहीत. तर सोपान कंपनीचे व्यवस्थापक प्रसाद यांनी त्यांच्या कंपनीस हवे असलेले हायड्रोलीक सिलेंडरचे सुटे पार्ट त्यांच्या कंपनीत घेवून न जाता ललित कंपनीत त्याची जोडणी केली. टेस्टींग करून हयगयीने निष्काळजीपणा केला. तर मृत कामगार पेखळे यांनी हायड्रोलीक सिलेंडरला नायट्रोजन ऐवजी ऑक्सिजन सिलेंडर जोडला. तसेच चुकीची हाताळणी करून हायड्रोलीक सिलेंडरला आॅक्सिजन वायूचा प्रमाणापेक्षा जास्त प्रेशर दिल्याने हा स्फोट झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेतील जखमी सोपान कंपनीचे व्यवस्थापक प्रसाद यांचाही मृत्यु झाला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक नागरे करीत आहेत.