टीव्ही सुरू करण्याचा बहाणा करून अल्पवयीन मुलीचा ७० वर्षीय वृध्दाने केला विनयभंग
नाशिक : टीव्ही सुरू करण्याचा बहाणा करून अल्पवयीन मुलीस घरात बोलावून घेत ७० वर्षीय वृध्दाने विनयभंग केल्याची घटना इंदिरानगर भागात घडली. ही बाब मुलीने आपल्या आईकडे कथन केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्र्यंबक शंकर गवळी असे संशयीत वृध्दाचे नाव आहे. संशयीताने गेल्या बुधवारी (दि.२०) दुपारच्या सुमारास हे कृत्य केले. टीव्ही सुरू करण्याच्या बहाण्याने शेजारी राहणा-या अल्पवयीन मुलीस घरात बोलावून घेत कुणास सांगितले तर तुला बघतो अशी धमकी व दमदाटी करीत त्याने विनयभंग केला. ही बाब मुलीने आपल्या आईकडे कथन केल्याने आईच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सय्यद करीत आहेत.
महिलेच्या गळयातील सोन्याची पोत दुचाकीस्वारांनी ओरबडली
नाशिक : रस्त्याने पायी जाणा-या महिलेच्या गळयातील सोन्याची पोत दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेली. ही घटना सिडकोतील उपेंद्रनगर भागात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगल संजय हाडोळे (रा.उपेंद्रनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मंगल हाडोळे या ३० सप्टेंबर रोजी रात्री फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या असता ही घटना घडली. परिसरात चक्कर मारून त्या घराकडे पायी जात असतांना उपेंद्रनगर बसथांबा भागात पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळय़ातील सुमारे ५० हजार रूपये किमतीची सोन्याची पोत हिसकावून पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक शेख करीत आहेत.