जिन्यावरून पाय घसरून पडल्याने २५ वर्षीय महिलेचा मृत्यु
नाशिक : राहत्या घरात जिन्यावरून पाय घसरून पडल्याने २५ वर्षीय महिलेचा मृत्यु झाल्याची घटना सिडकोतील सावतानगर भागात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सुवर्णा ज्ञानेश्वर मासुळे (रा.धनलक्ष्मी चौक) असे मृत महिलेचे नाव आहे. सुवर्णा मासुळे या मंगळवारी (दि.२६) आपल्या घरातील जिना उतरत असतांना ही घटना घडली. अचानक पाय घसरल्याने त्या पडल्या होत्या. या घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाल्याने कुटूंबियांनी तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास पोलीस नाईक बनतोडे करीत आहेत.
पाथर्डी फाटा भागात बेदम मारहाण केल्याची घटना
नाशिक : पत्नीसमवेत घराकडे पायी जाणा-या पतीस शिवीगाळ करीत दोघा भावांनी बेदम मारहाण केल्याची घटना पाथर्डी फाटा भागात घडली. या घटनेत दगड व फरशीचा तुकडा मारून फेकल्याने सदर इसम जखमी झाला असून त्याच्या खिशातील रक्कम आणि सोनसाखळी गहाळ झाली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर आव्हाड व अजय आव्हाड (रा.दोघे नरहरीनगर,पाथर्डी फाटा) अशी पादचारीस मारहाण करणा-या दोघा भावांची नावे आहेत. याप्रकरणी आसिफ मेहबुब शेख (रा.पवननगर,सिडको) यांनी तक्रार दाखल केली आहे. शेख सोमवारी (दि.२५) रात्री पत्नी सबिना व पुतण्या साहिल यांना सोबत घेवून पवननगरच्या दिशेने पायी जात असतांना ही घटना घडली. शिवाजी पुतळयाजवळ दोघा भावांनी दांम्पत्यास गाठून शेख यांना शिवीगाळ केली. यावेळी संतप्त भावांनी त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेत दगड आणि फरशीचा तुकडा फेकून मारल्याने शेख जखमी झाले असून अधिक तपास पोलीस नाईक बनतोडे करीत आहेत.
….