नाशिक : भद्रकाली पोलिस ठाणे हद्दीत दोन ठिकाणी जबरी चोरीच्या घटना घडल्यामुळे परिसरात या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. पहिल्या घटनेत पैसे काढून बँकेतून बाहेर पडणा-या महिलेच्या हातातील लाखोंची रोकड असलेली पिशवी भामट्यांनी पळविली तर दुस-या घटनेत टोळक्याने दोघांना बेदम मारहाण करीत सोनसाखळी ओरबाडून नेली आहे. याप्रकरणी पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शालिमार भागात राहणा-या रेहाना शेख ही महिला मंगळवारी (दि.२६) दुपारच्या सुमारास पैसे काढण्यासाठी नेहरू उद्यान परिसरातील महाराष्ट्र बँकेत गेल्या होत्या. लाखोंची रक्कम काढून त्या शालिमारच्या दिशेने पायी जात असतांना ही घटना घडली. परशुराम सायखेडकर नाट्यगृह परिसरात पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वार भामट्यांनी त्यांच्या हातातील पैश्यांची पिशवी हिसकावून पोबारा केला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठांसह भद्रकाली पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटिव्ही यंत्रणेच्या माध्यमातून चोरट्यांचा माग काढण्यात येत असून याप्रकरणी पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली. दुसरी घटना सोमवारी (दि.२५) रात्री साडे दहाच्या वाजेच्या सुमारास द्वारका भागात घडली. दोघा युवकांना टोळक्याने बेदम मारहाण करीत एका युवकाच्या गळय़ातील अडीच तोळे वजनाची व सुमारे ८० हजार रुपये किमतीची सोनसाखळी ओरबाडून नेली. याप्रकरणी प्रतिक मदन या युवकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या मारहाणीत दोघे युवक गंभीर जखमी झाल्याचे समजते. त्यामुळे संशयीतांची ओळख पटविण्यात अडथळा निर्माण झाला असून पोलिसांनी संशयावरून काही तरुणांना ताब्यात घेतल्याचे कळते.