नाशिक : अॅमेझॉन कंपनीच्या नोकरीसह गुंतवणुकीचे आमिष दाखवून भामट्यांनी महिलेस सव्वा दोन लाख रूपयांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलीस दप्तरी फसवणुकीसह आयटीअॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवानी घाडगे (रा.मखमलाबादरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. घाडगे यांच्या मोबाईलवर भामट्यांनी गेल्या महिन्यात संपर्क साधला होता. महिलेच्या मोबाईलवर ९६१८४५१०२० या व्हॉटसअप क्रमांकावरून संपर्क साधून भामट्याने महिलेस अॅमेझॉन कंपनीतील नोकरी करून पार्ट टाईम जॉबच्या माध्यमातून गुंतवणुकीवर जास्त फायदा होईल असे आमिष दाखविले. याकाळात तनिष्का डे या नावाने वेळोवेळी चॅटींग करून महिलेस २ लाख २१ हजार ८०० रूपये भामट्याने पाठविलेल्या लिंकवर भरण्यास भाग पाडले. अनेक दिवस उलटूनही बतावणीप्रमाणे महिलेस नोकरी व मोबदला न मिळाल्याने महिलेने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक चव्हाण करीत आहेत.