नाशिक – स्टेट बँक ऐवजी युनियने बँकेचे एटीएम कार्ड देवून अदलाबदली; चोरट्याने लांबविले दीड लाख
नाशिक : एटीएमकार्डची अदला बदल करीत भामट्यांनी वृध्दाच्या बँक खात्यातील दीड लाख रूपये लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कचरू खंडू झोमान (७३ रा.सुतार गल्ली,आडगाव) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. झोमान गेल्या सोमवारी (दि.४) मिनी स्टेटमेंट काढण्यासाठी जत्रा हॉटेल चौकातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम बुथमध्ये गेले होते. स्टेटमेंट काढत असतांना एका भामट्याने मदतीचा बहाणा करीत एटीएमकार्डची अदला बदल केली. ही बाब झोमान यांच्या घरी गेल्यानंतर लक्षात आली. झोमान यांच्या हातात स्टेट बँक ऐवजी युनियन बँकेचे एटीएम कार्ड देवून भामटा पसार झाला होता. तत्पूर्वी भामट्याने झोमान यांच्या बँक खात्यातून १ लाख ५१ हजार १२७ रूपयांची रोकड हातोहात लांबविली. अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.
…….
गोडावून फोडून रोकडसह केबल चोरी
नाशिक : गोडावून फोडून चोरट्यांनी गल्यातील रोकड आणि कॉपर केबल चोरून नेल्याची घटना महामार्गावरील एक्स्लो पॉईंट भागात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीसांनी एका परप्रांतीयास बेड्या ठोकल्या आहेत तर त्याचे चार साथीदार अद्याप फरार आहेत. मनोज परमेश्वर त्रिपाठी (४२ रा.सिध्दार्थनगर,उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या संशयीताचे नाव असून त्याचे मिश्रा,भुषण,अनिल व नायक नामक साथीदार अद्याप फरार आहेत. विजय दशरथ सहाणे (रा.अश्विननगर,सिडको) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. ज्युपिटर हॉस्पिटल समोरील डी.एस.केबल्स अॅण्ड स्विचगिअर नावाच्या गोडावून मध्ये ही घटना घडली. गुरूवारी (दि.२१) रात्री भामट्यांनी बंद गोडावूनच्या शटरचे कडीकोयंडा व कुलूप तोडून टेबलच्या ड्रावरमधील गल्यातून २० हजाराची रोकड आणि कॉपर केबल असा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गणेश शिंदे करीत आहेत.