नाशिक : भूमाफिया टोळीचा मास्टरमाइंड रम्मी राजपूतची रवानगी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील अंडा सेलमध्ये करण्यात आली. उपद्रवी तसेच गंभीर गुन्ह्यांमधील आरोपींना वठणीवर आणण्यासाठी अंडासेलमध्ये दाखल करण्यात येते. रम्मीची नुकतीच अंडा सेलमध्ये रवानगी करण्यात आल्याच्या वृत्तास जेल प्रशासनाने दुजोरा दिला. रम्मीचे स्थानिक कनेक्शन मोडून काढण्यासाठी त्याची अंडा सेलला रवानगी करणे महत्त्वाचे होते, असा दावाही करण्यात येतो आहे. गंगापूररोडवरील आनंदवली भागात रमेश वाळू मंडलिक (७०, रा. आनंदवली) यांची फेब्रुवारी २०२१ मध्ये निर्घृण हत्या झाली होती. या गुन्ह्यात पोलिसांनी तपास करीत १४ जणांना बेडया ठोकल्या. मात्र, या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार रम्मी राजपूत गुन्हा घडल्यापासून तब्बल साडेसात महिने फरार होता. दरम्यान, पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी सदर टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार (मोक्का) कारवाई केली. पोलिसांना गुंगारा देत हरीयाणात दडून बसलेल्या रम्मीसह त्याचा भाऊ जिम्मी राजपूतला शहर गुन्हे शाखेच्या पथकाने ५ आॅक्टोबर रोजी हरियाना मध्ये जेरबंद केले. या दोघांना विशेष कोर्टाने पोलिस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने त्यांची रवानगी नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. दरम्यान, राजकीय पार्श्वभूमी असलेल्या रम्मीवर कठोर कारवाई होणे अभिप्रेत असल्याने त्याची रवानगी अंडा सेलमध्ये रवानगी करण्यात यावी यासाठी पोलिस प्रशासनाकडून पाठपुरावा करण्यात आल्याने त्याची रवानगी अंडा सेलमध्ये करण्यात आली आहे.