नाशिक : दुकानफोडून रोकडसह मोबाईल व गिफ्ट वस्तू चोरणा-या चोरट्यास जिल्हा न्यायालयाने दोन वर्ष सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली. ही घटना सन.२०१८ मध्ये म्हसरूळ भागात घडली होती. हसन हमजा कुट्टी (४० रा.अश्वमेधनगर,पवार मळा पेठरोड) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मेघराज रमेश भोसले (रा.हिरावाडी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. भोसले यांच्या मालकिचे म्हसरूळ परिसरातील आदित्य गिफ्ट अप्लायसेस हे दुकान २३ एप्रिल २०१८ रोजी चोरट्यांनी फोडले होते. शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी गल्यातील दोन हजाराची रोकड, मोबाईल फोन आणि गिफ्टच्या वस्तू असा सुमारे ५१ हजार ८०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहाय्यक निरीक्षक व्ही. डी. शार्दुल यांनी या गुह्याचा तपास करून आरोपीस अटक केली होती. तसेच न्यायालयात आरोपी विरोधातील प्रबळ पुराव्यानिशी जिल्हा न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. हा खटला अतिरिक्त मुख्य न्यायादंडाधिकारी कोर्ट क्रमांक ५ चे न्या.श्रीमती व्ही.आर.माने यांच्या समोर चालला. सरकारतर्फे अॅड. पुनम घोडके यांनी काम पाहिले. न्यायालयाने परिस्थीतीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपीस दोन वर्ष सश्रम कारावास आणि दोन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.