नाशिक – चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून करून पसार झालेल्या संशयीतास बेड्या ठोकण्यात पंचवटी पोलीसांना यश आले आहे. तब्बल ११ वर्षापासून तो पोलीसांना गुंगारा देत होता. डंबाळवाडी ता.जि.नाशिक येथे संशयीतास अटक करण्यात आली असून तो वेशबदलून मोलमजूरी करून आपला उदनिर्वाह करीत होता. काशिनाथ बाळू पवार (रा.बनकरमळा,डंबाळवाडी) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे.
काशिनाथ पवार २०१० मध्ये आडगाव शिवारातील सैय्यद पिंप्री रोड भागात वास्तव्यास होता. मोलमजूरी करून उदनिर्वाह करणा-या पवार दांम्पत्यात चारित्र्याच्या संशयातून खटके उडत. याच संशयातून काशिनाथ पवार याने लोखंडी फावडे डोक्यात मारून आपल्या पत्नीचा खून केला होता. यानंतर तो पसार झाला होता. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तो मिळून येत नव्हता.
पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांचा आढावा घेवून आरोपींना जेरबंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पंचवटी पोलीस कामाला लागले होते. आरोपीबाबत कुठलाही पुरावा नसतांना वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शानाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक सत्यवान पवार यांचे पथक शोध घेत होते. प्रारंभी संशयीताचे मुळगाव असलेल्या चिंचओहळ ता. त्र्यंबकेश्वर गाठून संशयीताचा शोध घेतला. या ठिकाणी अनेकांनी तो गावात येत नसल्याचे व मृत झाला असावा असा संशय व्यक्त केला होता. तर एकाने गेल्या आठवड्यात दिंडोरी येथील बाजारात भेटल्याची माहिती दिल्याने पोलीसांनी आपला मोर्चा दिंडोरीच्या दिशेने वळविला. सर्वत्र शेतमजूरांचा शोध घेवूनही तो हाती लागत नव्हता अखेर रविवारी (दि.११) तो डंबाळवाडी येथील बनकर मळयात पोलीसांच्या हाती लागला.
संशयीताने गुन्ह्याची कबुली दिली असून गेली अकरा वर्ष तो परिसरात वेश बदलून व एका ठिकाणी दहा बारा दिवस रोजंदारी काम करून तो दुस-या ठिकाणी जात होता. संशयीताच्या अटकेने अकरा वर्षापूर्वी घडलेल्या घटनेचा उलगडा झाला असून ही कारवाई गुन्हे शोध पथकाने निरीक्षक अशोक साखरे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक निरीक्षक सत्यवान पवार,शिपाई विलास चारोस्कर,नितीन जगताप,कुणाल पचलोरे,उत्तम खरपडे,नारायण गवळी आदींच्या पथकाने केली.