नाशिक : खून करून पसार झालेल्या संशयीतास पोलीसांनी नांदेड रेल्वेस्थानक भागात बेड्या ठोकल्या. गेल्या दोन दिवसांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. ही घटना भद्रकालीतील वर्दळीच्या दूधबाजार परिसरात घडली होती. आकाश गोपाळसिंग आडे (१९ रा.सिंहकमान,गोविंदनगर नांदेड) असे अटक करण्यात आलेल्या संशयीताचे नाव आहे. दूधबाजारातील हेलबाडी मज्जीद समोरील सपट चहाच्या दुकानासमोर सोन्या उर्फ नितीन बालाजी गायकवाड (रा. म्हाडा कॉलनी, वडाळागाव) याची सोमवारी (दि.१८) हत्या करण्यात आली होती. मयत नितीन आणि त्याचा एक साथीदार चहा दुकानासमोरील रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी बसलेले होते. व्यसनाच्या आधीन असलेल्या या दोघांमध्ये अज्ञात कारणातून वाद झाला. यावेळी अंगाने सडपातळ असलेल्या संशयीताने नितीनच्या पोटावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली. हत्येच्या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक देवीदास शिवाजी भालेराव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अज्ञात आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होती. पोलीसांनी सीसीटिव्ही यंत्रणेच्या माध्यमातून चाचपणी करीत संशयीताचा शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही. पोलीस त्याचा शोध घेत असतांना संशयीत मनमाड येथे गेल्याची माहिती पोलीसांना मिळाली मात्र तत्पूर्वीच त्याने औरंगाबादच्या दिशेने कुच केल्याचे कळले. पोलीसांनी औरंगाबाद गाठले असता तो नांदेड येथे गेल्याचे समजले. त्यामुळे पोलीसांनी नांदेड गाठले. स्थानिक पोलीसांच्या मदतीने संशयीतास हुडकून काढत रेल्वेस्थानक भागात बेड्या ठोकल्या. संशयीताने खूनाची कबुली दिली असून हा खून पत्नीस केलेल्या मारहाणीतून झाल्याचे बोलले जात आहे. ही कारवाई भद्रकालीचे वरिष्ठ निरीक्षक संभाजी निंबाळकर, दत्ता पवार व दिलीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते,हवालदार युवकाज पाटील,राजू निकम पोलीस नाईक सचिन अहिरराव,रमेश कोळी,उत्तम पवार अंमलदार सागर निकुंभ,उत्तम खरपडे,गोरख साळुंके,संजय पोटींदे व जितेंद्र पवार आदींच्या पथकाने केली.