बँकेतून पैसे काढून परतलेल्या जेष्ठास बोलण्यात गुंतवून एक लाख रुपये केले लंपास
नाशिक : बँकेतून पैसे काढून परतलेल्या जेष्ठ नागरिकाला बोलण्यात गुंतवून भामट्यांनी एक लाखाची रोकड हातोहात लांबविली. ही घटना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बोधलेनगर शाखा परिसरात घडली. दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली पिशवी घेवून दोघांनी पोबारा केला असून, याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगदिश जगन्नाथ विसपुते (६४ रा. विधातेनगर,पखालरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. विसपुते बुधवारी (दि.२०) क्रोमा इलेक्ट्रॉनिक्स शोरूम शेजारील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बोधले नगर शाखेत पैसे काढण्यासाठी गेले होते. बचत खात्यातील एक लाख रूपयांची रक्कम काढून त्यांनी मोबाईल व रक्कम एका पिशवीत ठेवली. आवारात पार्क केलेल्या दुचाकीच्या डिक्कीत ते पिशवी ठेवत असतांना ही घटना घडली. दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांना बोलण्यात गुंतविले. व एकाने विसपुते यांचे लक्ष नसल्याची संधी साधून डिक्कीतील पिशवी काढून घेत दोघांनी दुचाकीवर द्वारकाच्या पोबारा केला. पिशवीत लाखाची रोकड व मोबाईल असा सुमारे १ लाख ५ हजार रूपयांचा ऐवज होता. अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.
जेलरोडला एकाची आत्महत्या
नाशिक : जेलरोड परिसरातील ३८ वर्षीय व्यक्तीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. सदर इसमाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. राकेश बन्शी हिरे (रा.रंजनीगंधा सोसा.मंगलमुर्ती नगर) असे आत्महत्या करणा-या व्यक्तीचे नाव आहे. हिरे यांनी मंगळवारी (दि.१९) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यु झाला. अधिक तपास जमादार गांगुर्डे करीत आहेत.