गौळाणे फाटा भागात भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत कामगार महिला ठार
नाशिक : भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत २९ वर्षीय कामगार महिला ठार झाली. हा अपघात महामार्गावरील गौळाणे फाटा भागात झाला. याप्रकरणी अज्ञात टेम्पो चालकाविरूध्द अंबड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. गंगूबाई सोपान भंबूर (२९ रा.दत्तनगर,अंबड) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. गंगाबाई भंबूर या मंगळवारी (दि.१९) गौळाणे फाटा येथील नेहरू गार्डन भागातील एका शॉपवर नियमीत कामासाठी गेल्या होत्या. दुपारच्या सुमारास त्या पायी महामार्गावरील रस्ता ओलांडत असतांना हा अपघात झाला. भरधाव येणाºया एमएच ०४ जेके ४३५१ या टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या गंगूबाई यांचा मृत्यु झाला. चालक आपल्या वाहनासह पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक उत्तम सोनवणे करीत आहेत.
भाजीपाला विक्रीवरून कुटुंबियास मारहाण
नाशिक : भाजीपाला विक्री करण्याच्या वादातून टोळक्याने कुटुंबियास बेदम मारहाण केल्याची घटना पाथर्डी फाटा भागात घडली. या घटनेत ६० वर्षीय वृध्द जखमी झाले असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविंद्र गणपत सोनवणे,परमेश्वर गणपत सोनवणे,समाधान पाटील व योगीराज पाटील (रा.सर्व निसर्ग कॉलनी,पाथर्डी फाटा) असे मारहाण करणा-या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी हरिश्चंद्र सिताराम पाटील (रा.बल्लाळेश्वर अपा.निसर्ग कॉलनी) यांनी तक्रार दाखल केली आहे. पाटील कुटूंबिय भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. सोमवारी (दि.१८) निसर्ग कॉलनीत पाटील आपला व्यवसाय सांभाळत असतांना ही घटना घडली. संशयीतांनी पाटील कुटूंबियास गाठून या परिसरात तूम्ही भाजीपाला विक्री करायचा नाही या कारणातून वाद घालत हरिश्चंद्र पाटील यांच्यासह पत्नी, मुलगा आणि भावास टोळक्याने बेदम मारहाण केली. या घटनेत लाकडी दांडक्याचा वापर करण्यात आल्याने हरिश्चंद्र पाटील जखमी झाले असून अधिक तपास हवालदार गारले करीत आहेत.