नाशिक : जुन्या वादातून टोळक्याने एकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना सिडकोतील राजरत्ननगर भागात घडली. संशयीतापैकी चार जण पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबीन तन्वीर कादरी खान (रा.साईग्राम सोसा.उपेंद्रनगर),गौरव उमेश पाटील (रा.मानिकनगर),फरहान उर्फ फ-या काळया जाकीर शेख (रा.राजविहार मागे,साईबाबानगर),दिपक खंडू साळूंके – पारधी व आकाश गणेश कुमावत (रा.दत्तचौक,सिडको) अशी संशयीतांची नावे असून दीपक पारधी वगळता अन्य सर्व पोलीस रेकॉर्डवरील आहेत. याप्रकरणी भगवान मराठे (रा.तोरणानगर,पवननगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. मराठे यांचा मुलगा रितेश भगवान मराठे हा सोमवारी (दि.१८) रात्री राजरत्ननगर भागातील गार्डन परिसरातील गेला असता ही घटना घडली. संशयीत टोळक्याने त्यास गाठून काही दिवसांपूर्वी झालेल्या वादाची कुरापत काढून त्यास बेदम मारहाण केली. या घटनेत कोयत्याने त्याच्यावर वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला असून अधिक तपास उपनिरीक्षक नाईद शेख करीत आहेत.