नाशिक : मोकळया भूखंडावर पार्क केलेल्या कार समोर जेसीबी लावल्याने दोन शेजा-यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत बापलेकाने स्टीलच्या रॉडचा वापर केल्याने कार मालक जखमी झाला असून, याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर पवार व निवृत्ती पवार (रा. शरयू पार्क, जत्रा हॉटेल समोर) अशी शेजा-यास रॉडने मारहाण करणा-या बापलेकाचे नाव आहे. याप्रकरणी विजय पंडीत नरोटे (रा.सदर) यांनी तक्रार दाखल केली असून तक्रारदार आणि संशयीत एकमेकांसमोर राहणारे शेजारी आहेत. नरोटे यांनी मंगळवारी (दि.१९) आपल्या घरासमोरील रस्त्याच्या कडेला कार पार्क केलेली असतांना रात्री पवार बापलेकाने आपला जेसीबी कार समोर उभा केला. यावेळी नरोटे यांनी कार समोर जेसीबी लावू नका कार काढण्यास अडचण होते असे समजवून सांगितले असता संतप्त बापलेकांनी तू येथे कसा राहतो अशी दमबाजी करीत त्यांना बेदम मारहाण केली. या घटनेत जेसीबीतील स्टीलचा रॉड काढून बापलेकाने मारहाण केल्याने नरोटे जखमी झाले असून अधिक तपास हवालदार बस्ते करीत आहेत.