नाशिक : पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात घुसून वृध्देची सोन्याची पोत हिसकावून नेणा-या भामट्यास पोलीसांनी अवघ्या चार तासात जेरबंद केले. संशयीतास मुद्देमालासह पंचवटी पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले असून ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली. संदिप पोपट कालेवार (२७ रा.मधुबन कॉलनी,म.बाद रोड) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी बेबीबेन शंकरलाल पटेल (७७ रा.प्रभात रेसि.राजपाल कॉलनी) यांनी तक्रार दाखल केली आहे. सोमवारी (दि.१८) दुपारच्या सुमारास पटेल या आपल्या घरात असतांना ही घटना घडली होती. पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात घुसलेल्या अज्ञात तरूणाने त्यांच्या गळयातील सुमारे ९० हजार रूपये किमतीची सोन्याची पोत हिसकावून पोबारा केला होता. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पंचवटी पोलीस आणि शहर गुन्हे शाखा भामट्याच्या मागावर असतांना कुठलाही पुरावा नसतांना युनिट १ च्या पथकाने अवघ्या चार तासात संशयीतास बेड्या ठोकल्या. मधुबन कॉलनीतील अॅक्सीस बँकेच्या एटीएम परिसरात ही कारवाई करण्यात आली. पोलीसांची चाहूल लागताच संशयीताने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र सापळा लावलेल्या पोलीसांनी वेळीच झडप घालून त्यास जेरबंद केले. संशयीताच्या ताब्यातून ६८ हजार ४०० रूपये किमतीची तुटलेली पोत मिळून आली असून त्यास मुद्देमालासह पंचवटी पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.