नाशिक – जुने नाशिकमधील दुध बाजार परिसरात पोलिस चौकीजवळ एका टोळक्याने चाकूचे वार करून एकाचा खून केल्यामुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. नितीन उर्फ सोनू बालाजी गायकवाड (रा. भारत नगर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दूध बाजार पोलिस चौकीजवळ काही तरुण नशा करत होते. नशा करताना त्यांच्यात वाद झाले. तरुणांचे वाद नित्याचेच झाल्याने स्थानिकांनीही याकडे दुर्लक्ष केल्याचे समजते. मात्र मारेकऱ्यांनी नितीनवर धारदार शस्त्राने वार करून जीवे मारले. घटनेची माहिती समजताच पोलिस उपआयुक्त अमोल तांबे यांच्यासह सहायक आयुक्त, भद्रकाली पोलिस घटनास्थळी दाखल झाली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस तपास करीत आहेत.