पोलीस मुख्यालयामागेच अवैध मद्य विक्री
नाशिकः आडगाव ग्रामिण पोलीस मुख्यालयाच्या पाठिमागेच हॉटेल दख्खन दरवाजा येथे बेकायदेशीररीत्या देशी विदेशी मद्याची विक्री केल्या प्रकरणी छापा मारून आडगाव पोलीसांनी ३ हजाराचे मद्य जप्त केले आहे. निलेश भगावान जगताप (४२, रा. धात्रकफाटा, आडगाव शिवार) या हॉटेल चालकास पोलीसांनी अटक केली आहे. ग्रामिण पोलीस मुख्यालयाच्या पाठिमागेच असलेल्या हॉटेल दख्खन दरवाजा येथे अवैध मद्य विक्री होत असल्याची माहिती मध्यवर्ती गुन्हे शाखेस मिळाली होती. त्यानुसार पथकाने तेथे छापा टाकून ३ हजार १२० रूपयांच्या प्रिंन्स संत्रा, मॅकडॉल, ब्लेंडर प्राईड अशा बाटल्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार बस्ते करत आहेत.
…..
तडीपार सराईत ताब्यात
नाशिकः शहर तसेच जिल्ह्यातून तडीपार केले असतानाही शहरात वावरणार्या सराईत तडीपारास म्हसरूळ पोलीसांनी अटक केली आहे. सकंत भाऊराव शिंदे (२८, रा. पांजरा चाळ, किशोर सुर्यवंशी मार्ग, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई विजय विधाते यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संकेत शिंदे यास परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी दोन वर्षासाठी नाशिक शहर तसेच जिल्ह्यातून तडीपार केलेले आहे. असे असतानाही तो कोणतीही पूर्वपरवानगी न घेता राहते घराच्या परिसरात हातात लोखंडी कोयता घेऊन आरडाओरड करत एकाएकाला जीवे ठार मारीन अशा धमक्या देत दहशत पसरवत असल्याचे समजताच म्हसरूळ पोलीसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. अधिक तपास पोलीस नाईक हुल्लुळे करत आहेत.
…..
दरोड्याच्या तयारीतील संशयित जेरबंद
नाशिकः दरोड्याच्या तयारीत आंधारात लपून आपले अस्तित्व लपवण्याच्या प्रयत्न करणार्या संशयितास पंचवटी गस्त पथकाने सोमवारी (दि.१०) पहाटे शरदचंद्र पवार मार्केट यार्ड येथून जेरबंद केले.
निलेश दिलीप वारीकर (२४, रा. शक्तीनगर चौक, हिरावाडी, पंचवटी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई गोरक्ष साबळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पंचवटी पोलीसांचे पथक गस्त घालत असताना शरदचंद्र पवार भाजी मार्केट यार्ड परिसरात पोलीसांना बघून संशयित वारीकर हा लपून बसला त्याची अधिक चौकशी केली असता तो चोरीच्या उद्देशाने लपून बसल्याचे निदर्शनास येताच त्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक सानप करत आहेत.