नाशिक : बिल देण्याच्या कारणातून पोलीस अधिकारी असल्याचे सांगून एकाने हॉटेल मालकास कारची धडक देवून फरफटत नेल्याची घटना महामार्गावर घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय ठाकूर (नाव गाव पूर्ण नाही) असे संशयीताचे नाव आहे. कुशल संजय लुथरा (रा.खोडेनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. लुथरा हॉटेल हरिओम ढाबा येथे शनिवारी (दि.१६) रात्री आपला व्यवसाय सांभाळत असतांना ही घटना घडली. स्विफ्ट कारमधून आलेल्या एकाने पनीर चिल्लीची आॅर्डर दिली. पार्सल घेवून संशयीत जावू लागल्याने हॉटेल मालकाने पैश्यांची मागणी केली असता ही घटना घडली. संशयीताने क्राईम ब्रँचचा पोलीस अधिकारी असल्याचे सांगून ओळख पत्र दाखविले. मात्र ते ओळखपत्र पोलीस मित्र असल्याचे लक्षात येताच लुथरा यांनी तगादा लावला परंतू तो पर्यंत त्याने आपली कार गाठली. पैसे न देताच कारमधून पळून जात असल्याचे लक्षात आल्याने लुथरा कार समोर जावून उभे राहिले असता संशयीताने त्यांना धडक दिली. या घटनेत लुथरा कारच्या बोनटवर जावून आदळले. त्यांनी प्रसंगावधान राखत बोनेट पकडून ठेवल्याने अनर्थ टळला. मात्र संशयीताने आपले वाहन मुंबईनाक्याच्या दिशेने तसेच दामटले. काही अंतरावर ब्रेक मारल्याने लुथरा बोनेटवरून पडले असून ते बालंबाल बचावले आहे. लुथरा यांना फरफटत नेल्याने हाता पायास दुखापत झाली असून,तोतया अधिकारी पसार झाला आहे. ही घटना हॉटेलच्या सीसीटिव्ही यंत्रणेत कैद झाली असून पसार झालेल्या भामट्याचा इंदिरानगर पोलीस शोध घेत आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक सुहासिनी लुथरा करीत आहेत.