मोबाईल परत मागितल्याच्या रागातून धारदार शस्त्राने वार
नाशिक : मोबाईल परत मागितल्याच्या रागातून एकाने मोबाईलधारकास धारदार शस्त्राने खोपसल्याची घटना सिडकोतील त्रिमुर्तीचौक भागात घडली. या घटनेत तरूण जखमी झाला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष व्यवहारे (रा.शिवशक्ती चौक,सिडको) असे संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी रविंद्र रतन गांगुर्डे (३२ रा.सरस्वती चौक,सिडको) यांनी तक्रार दाखल केली आहे. व्यवहारे याने गांगुर्डे यांचा मोबाईल फोन करण्यासाठी घेतला होता. त्यानंतर तो मोबाईल घेवून पसार झाला होता. रविवारी (दि.१७) तो त्रिमुर्ती चौकातील दिव्याअॅड भागात असल्याची माहिती मिळाल्याने गांगुर्डे तेथे गेले असता ही घटना घडली. गांगुर्डे यांनी त्यास गाठत मोबाईलची मागणी केली असता संशयीतांने शिवीगाळ दमदाटी केली. यावेळी माझ्या नादाला लागू नको नाही तर तूझा बेत पाहिन अशी धमकी देत गांगुर्डे यांच्या पोटावर धारदार शस्त्राने वार करीत तो पसार झाला. अधिक तपास पोलीस नाईक संगम करीत आहेत.
………
अल्पवयीन मुलीने विषारी औषध सेवन करून केली आत्महत्या
नाशिक : नाशिकरोड परिसरातील कॅनॉल रोड भागात राहणा-या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. सदर मुलीच्या आत्महत्याचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सोनम जीवन कांबळे (रा.आम्रपाली नगर) असे आत्महत्या करणा-या मुलीचे नाव आहे. सोनम कांबळे हिने रविवारी (दि.१७) सकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरी अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी तिला तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार माळोदे करीत आहेत.