नाशिक : वाहतूक नियंत्रण करीत असतांना पोलीसास मारहाण केल्याप्रकरणी एकाच कुटूंबातील तीघांविरूध्द मुंबईनाका पोलीस ठाण्यात शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबाईल मधून शुटींग काढण्याच्या कारणातून हा वाद झाला होता. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. संजय मधूकर आहेर (४०) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव असून याप्रकरणी आई जिजाबाई आहेर व पत्नी जयश्री आहेर (रा.सर्व सुचितानगर) आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई प्रशांत पाटील यांनी तक्रार दाखल केली आहे. पाटील शनिवारी (दि.१६) रात्री आपल्या सहकाºयांसमवेत पेट्रोलींग करीत असतांना ही घटना घडली. इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक कडून गोविंदनगरच्या दिशेने पोलीस कर्मचारी आपल्या वाहनातून जात असतांना जॉगिंग ट्रॅक बोगदा भागात मोठी वाहतूक कोंडी होती. त्यामुळे पाटील यांच्यासह कर्मचाºयांनी आपल्या वाहनातून उतरत विरूध्द दिशेने येणारी वाहने परत मागे वळविण्यास सांगत असतांना ही घटना घडली. यावेळी संशयीत आहेर पोलीस कारवाईची मोबाईलमधून शुटींग काढत होता. पोलीसांनी त्यास टोकले असता त्याने पोलीसांना शिवीगाळ करीत अंगावर धावून जात पाटील यांना मारहाण केली. पोलीसांनी त्यास पकडून पोलीस ठाण्यात नेत असतांना त्याच्या मदतीला धावून आलेल्या आई आणि पत्नीने पोलीस कारवाईस विरोध करीत संशयीतास पोलीस ठाण्यात नेण्यास मज्जाव केला. अधिक तपास उपनिरीक्षक चेतन श्रीवंत करीत आहेत.