नाशिक : रिक्षा प्रवासात लुटमार करणा-या दोघांना पोलीसांनी अटक केली. मित्रास बस मधून घराकडे परतणा-या दोन परप्रांतीयाना लुटण्यात आले होते. यावेळी एकाचा मोबाईल व एक हजार रूपयांची रोकड बळजबरीने काढून घेत संशयीतांनी पोबारा केला होता. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय प्रकाश शिंदे (२७ रा.माळेगाव एमआयडीसी,सिन्नर) आणि पवन रामलाल पवार (२४ रा.अशोकनगर,सातपूर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी विश्वजीत विजय बीहुरा (२२ मुळ रा. उडीसा हल्ली उपेंद्रनगर सिडको) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. बीहुरा आणि त्याचा मित्र मनोरंजन हे दोघे शुक्रवारी (दि.१५) रात्री पुण्याहून आलेल्या आपल्या मित्रास सोडण्यासाठी ठक्कर बाजार बसस्थानकात आले होते. आठ वाजेच्या सुमारास ते मित्रास बसमध्ये बसवून रिक्षाने सिडकोला जात असतांना ही घटना घडली. ठक्कर बाजार बसस्थानक परिसरात ते दोन प्रवासी बसलेल्या रिक्षातून प्रवास करीत असतांना टिळकवाडी सिग्नल जवळील दारू दुकाना भागात रिक्षातील दोघा भामट्यांनी दमदाटी करीत मित्र मनोरंजन याच्या हातातील मोबाईल आणि खिशातील एक हजार रूपये बळजबरीने काढून घेतले. एवढ्यावरच न थांबता भामट्यांनी रिक्षा वळवून एनडीपटेल मार्गावरील एसटी वर्क शॉप भागात आणली. या ठिकाणी बीहुरा यांच्याकडे तीन हजार रूपयांची मागणी करण्यात आली. परंतू बीहुरा यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने भामट्यांनी दोघा मित्रांना लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करीत पोबारा केला होता. याप्रकरणी पोलीस दप्तरी नोंद होताच पोलीसांनी रविवारी दोघा भामट्यांना हुडकून काढत बेड्या ठोकल्या आहेत. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खैरनार करीत आहेत.